या कळा नव्हे दुःखाच्या … हितगुज तुझे सत्वाशी …
शापिताचे भोग नव्हे हे … पुण्याने भरली ओटी …
चार दिसाचा खेळ … सृजनांशी ज्याचा मेळ …
जरी चित्त सैरभैर … ही नवचैतन्याची वेळ …
घेई विसावा क्षणभर … निसर्गाशी जुळे नाळ …
सजे पालखी बीजाची … होई तू भाग्यवान …
कोणी म्हणती हा विटाळ … निषिद्ध हा काळ …
सांग जगा तोऱ्यात … सृष्टीचे हे वरदान …
कुणी काढता वेड्यात … कोडे त्यास थेट घाल …
कसा झाडाच्या फळाशी … नाही बिजाचा विटाळ …
खेळ झिम्मा पोरी आता … छेड सूर आनंदाचे …
तुझ्या कुशीत रुजले … गुपित हे विश्वाचे …
कळी फुलू दे जराशी … मन होऊ दे हिंदोळा …
भान जन्माचे देतो … तो हा आनंद सोहळा …
ही कविता माझी नाही बरं का! 2018 मध्ये ‘Sony Marathi’ या channel वर ह.म. बने तु.म. बने नावाची एक सुंदर मालिका प्रदर्शित झाली होती. त्यातल्या एका episode मध्ये ही एक छान कविता सादर केली आहे . खूप सुंदर सादरीकरण, भावस्पर्शी विषय मांडण्यात आला होता. पहिल्यांदा पाळी आल्यावर … घाबरलेल्या आपल्या मुलीला सावरण्यासाठी तिचा बाबा या कवितेतून, तिला पडलेल्या असंख्य प्रश्नांची अगदी सहजपणे उत्तरे देतो. त्या एपिसोड चे शीर्षकही ‘चला बोलूया’ असेच आहे.
खरंच .. आपण या नाजुक विषयावर सहसा फार बोलत नाही… बोलणे टाळतोच. टेलिव्हिजन सारखे माध्यम असून सुद्धा … याबाबतीत असणारे समज – गैरसमज किंवा श्रद्धा – अंधश्रद्धा याविषयी बोलले गेलेले नाही. तो विषय ह.म. बने तु.म. बने या मालिकेत अगदी प्रभावीरीत्या मांडण्यात आलेला आहे. हल्ली शाळेमध्ये या गोष्टीविषयी मुलींना आधीच माहिती दिलेली असते. पण तरीही जेव्हा अचानक पणे … मुलींना पहिल्यांदा periods सुरू होतात. तेव्हा त्या भांबावून जातात, त्यांच्या मनात गोंधळ सुरू असतो. कसे react करावे हे त्यांना समजत नाही. शारीरिक वेदना आणि मनाची घालमेल या द्विधा मनस्थितीत त्या अडकतात. अशावेळी घरात असणारी एक आई, मोठी बहीण, आजी, मामी, काकी, मावशी यापैकी … कोणी विश्वासू व्यक्ती सोबत संवाद साधणे गरजेचे असते. पण काही कामानिमित्त घरातली स्त्री बाहेर असेल तर एक पालक म्हणून … आपला पुरुष वर्ग छोटीशी भूमिका नक्कीच पार पाडू शकतात. घरात असणारे बाबा, काका, आजोबा हे सुद्धा आपल्या वयात येणाऱ्या मुलीच्या मनावरचे दडपण नक्कीच कमी करू शकतात. हा विषय फक्त बायकाच हाताळू शकतात असे काही नाही. पुरुष सुद्धा या situation मध्ये आपल्या मुलीला, आपल्या नातीला , खंबीर साथ नक्कीच देऊ शकतात. पण अनेक ठिकाणी असे होताना दिसत नाही. कारण मुली त्याबाबतीत थोड्या uncomfortable असतात. आपल्याला समजून घेणार… आपल्यासारखंच कोणीतरी समोर असावं… असं त्यांना वाटत असतं. जर असे कोणी त्या वेळेला available नसेल … तर तिला … तिची स्पेस देऊन … फक्त तिच्या अवतीभवती राहून …. तिला काय हवे नको ते पाहिले, काळजी घेतली. तर तिचा बाबा कधी तिचा मित्र होईल. हे तिला कळणार सुद्धा नाही. बाबा, आजोबा … तिच्या या वळणावर … तिला भक्कम आधार देऊन, तिचे अवघडले पण कमी करू शकतात. शरीरात आणि मनात होणारा बदल स्वीकारताना तिच्या मनाची होणारी घालमेल तुम्ही थोडी समजून घेतली. आणि तिच्याशी संवाद साधला तर तुमची फुलराणी कायम हा आनंद सोहळा स्मरणात ठेवेन.
Leave a comment